
...अन् पुण्यात खासदार "#शिरोळे_प्रकटले"; अहवाल प्रकाशनावरून आपचा भाजपवर निशाणा
पुणे (सह्याद्री बुलेटीन) - पुण्यात भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांच्या चार वर्षांच्या अहवालाचे प्रकाशन शुक्रवारी (दि.16)मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्या निमित्ताने संसदेत प्रश्न ,चर्चेत फारसे तोंड न उघड़णारे खासदार अनिल शिरोळे पुण्यात प्रकटले हे उत्तमच झाले. शिरोळे यांनी केलेल्या कामाविषयी खात्रीशीर अधिकृत माहिती देवू शकणार्या पुण्याच्या प्रथम नागरिक, भाजपच्या महापौर मुक्ता टिळक,श्रीनाथ भिमाले, योगेश मुळीक, महापालिकेचे प्रमुख पदाधिकारी वैगेरे या प्रकट समयी परदेश दौऱ्यावर असल्याने कामांची खातरजमा होऊ शकणार नाही, असा खोचक चिमटा आम आदमी पार्टी ने काढला आहे. "#शिरोळे_प्रकटले" हा हैशटग वापरून त्यांच्या आश्वासनांची आठवण करून दिली गेली.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ने जुमलेबाजी केली होती, तशीच जुमलेबाजी अनिल शिरोळे यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात केली होती. त्यांच्या जाहीरनाम्यात रिटेल क्षेत्रात एफडीआय आणला जाणार नाही , तसेच भ्रष्टाचार निर्मुलनासाठी ई प्रशासन आणले जाईल या बरोबरच ‘पुणे तेथे बरेच उणे ‘ अशी टिप्पणी करत आश्वासने दिली होती. सक्षम बीआरटी ही घोषणा सर्वचजण देत होते. त्या बीआरटी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत साडेचार वर्षात काहीच सुधारणा नाही. दर तीन महिन्यातून प्रत्येक विधानसभेत जनता दरबार घेण्याची घोषणा त्यांनी केली होती. असा कोणताच जनता दरबार त्यांनी भरवला नाही, उलट पाणी मिळत नसल्याने त्रस्त जनतेलाच त्यांच्या ऑफिसवर ठिय्या मांडायला लागला. सटेलाईट सिटी अशी जुळी उपनगरे उभी करण्याची घोषणा पण हवेतील होती. सुमारे ३००-४०० गाड्यांसाठी किमान २०-२५ वाहनतळ उभी करू या घोषणेचा आणि वास्तवाचा आज काहीच संबंध नाही.
जाहीरनाम्यातील आणखी एक मोठी घोषणा म्हणजे शिक्षण हक्क कायदा बारावी पर्यंत लागू करण्याची . त्याबाबत त्यांनी कुठे तोंड उघड्ल्याचेही ऐकिवात नाही. सात वर्षात झोपडपट्टी मुक्त पुणे शहर उभे करू असे आश्वासन त्यांनी दिले होते. आज नवीन समाविष्ट गावातही झोपडपट्ट्या वाढत आहेत. घोरपडी जवळ रेल्वे वर उड्डाणपूल अजूनही कागदावर आहे. पुण्यातील नद्यांचा परिसर साबरमती सारखा सुंदर करू ही घोषणा स्वच्छ गंगा अभियानाप्रमाणे अयशस्वी ठरली आहे. दुर्बल घटकातील महिलांना ५०० रुपये पेन्शन ही घोषणा म्हणजे अच्छे दिन सारखेच स्वप्न ठरले आहे. खासदार निधीचा वापर सार्वजनिक रुग्णालयामधील सुविधा अत्याधुनिक करण्यास वापरू असे आश्वासन दिले होते.
दरम्यान संसदेत त्यांनी एकही विधेयक आणले नाही, प्रश्न ,चर्चा सहभाग सरासरीच्या 25 टक्के सुद्धा नाही असे त्यांचे रिपोर्ट कार्ड सांगते. एचएएल मधील जमीन अग्रो बायोटेक साठी वापरू असे सांगितले होते. रेल्वे चे पादचारी ओवर ब्रिज रुंद व अत्याधुनिक चलत जिन्याचे करू अशी खूप आश्वासने दिली होती. खासदार निधीचा पूर्ण वापर केलेला नाही. शहरात फक्त वाढदिवस, लग्ने या प्रसंगी बाहेर पडणारे खासदार आज प्रकटले. त्यामुळे स्वतःची पाठ जनतेकडून थोपटून न घेता मुख्यमंत्र्याना गटबाजीच्या राजकारणासाठी पुण्यात आणून पाठ थोपटून घेण्याला जनता यावेळेस फसणार नाही असे आम आदमी पार्टीचे प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.